Thursday 2 January 2014

एक नातं वेगळं..... !!!


माझी शाळा घरापासून एक १५ ते २० मिनिटाच्या अंतरावर... आणि शाळा म्हणजे एकदम गावात... आता पुणे शहर यामध्ये गाव कुठे आलं? पुण्यामध्ये जी ठिकाणे पूर्वीपासून होती,  त्या ठिकाणाला गाव म्हणतात. शाळा ही फ़क्त ५ वी ते १० वी पर्यंतच आहे. आता ज्युनियर  कॉलेज पण चालू झालंय.

मी नुकताच ५ वी मध्ये प्रवेश घेतला होता. नविन शाळा म्हणून तस कौतूक तर होतच. आई पहिल महीनाभर शाळॆत सोडायला आली. नंतर मी माझा शाळेत जायला लागलो. शाळेत जाण्यासाठी घरापासून दोन रस्ते जात होते. त्यातला एक मोठा रस्ता आणि एक छोटा रस्ता. खरं सांगायच तर तसा त्या रस्त्यांमध्ये असा काही फ़रक नव्ह्ता पण तरी त्याला बरेच जण अश्या दोन रस्त्यांनी ओळखायचे. आम्ही सगळे मित्र शक्यतो छोट्या रस्त्यानेच जायचो. असंच एक वर्ष निघून गेलं.

६ वी ला असताना माझ्याकडे सायकल आली. मी आता सायकलने शाळेत जायला सुरुवात केली. आता आम्ही सगळे मित्र मोठ्या रस्त्याने जायला लागलो . असच एक दिवस मी शाळेत जात असताना माझ्याबरोबर शाळेतले काही मित्र होते. शनिवार पेठ पोलीस चौकीच्या अलीकडे मोठ्या रस्त्याने जाताना एका मित्राने मस्ती केली. त्याने कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज काढला. आणि त्याला प्रतित्तोर म्हणून तसाच आवाज आला. सगळे हसायला लागले. मला हा आवाज कुठून आला कळलच नाही

परत दुसय्रा दिवशी असच घडलं. पण आज माझ लक्ष होत की तो आवाज कुठून येतो. शनिवार पेठ पोलीस चौकीच्या अलीकडे एक प्रभात टि स्टॉल आहे. त्या इमारतीत पहिल्या मजल्यावर एक घर आहे. त्या घराच एक विशेष होतं. त्या घराच्या ज्या खिडक्या होत्या त्यांच्या एकदम खाली एक छोटी खिडकी होती. त्यालासुध्दा एक ग्रिल केलेलं होतं. ती खिडकी त्यांनी त्यांच्या त्या घरातल्या कुत्र्यासाठी केली होती.

शाळेतल्या मुलांना ते कळलं होतं दररोज कोण ना कोणीतरी येऊन कुत्र्याचा आवाज काढायचं आणि ते कुत्र त्याच्या त्या बारीक खिडकीपाशी येऊन खाली बघुन भुंकायचं. सगळी मुलं हसायची आणि निघुन जायची. असं खूप दिवस होत राहील. फ़क्त बदल एवढाच झाला की आवाज देणारी मुलं बदलत राहीली. नंतर नंतर आम्ही मित्रांनी तो आवाज करण सोडून दिलं पण दुसर कोणिसुध्दा तसा आवाज दिला आणि परत प्रतित्तोर म्हणुन तसाच आवाज आला की आम्हाला हसू यायचं. अशीच शाळेतली ६ वर्षे निघून गेली. नंतर पुढे कॉलेज आणि करीअर.

एक दिवस असच त्याच मोठ्या रस्त्याने जाताना एका मुलाने सायकलवरुन जाताना भूंकण्याचा आवाज काढला पण आज वेगळच घडलं. प्रतित्तोर म्हणुन ते कुत्र खिडकीपाशी आलच नाही. मन थोडं अस्वस्थ व्हायला सुरुवात झाली. काही कळेनास झालं.

त्यानंतर दोन दिवसांनी मी माझ्या शाळेतल्या मित्रांना भेटलो. त्यांना तो घडलेला किस्सा सांगितला. त्यावर त्याने सांगितलं की मागच्या महीन्यात तो तिकडून जात असताना कोणितरी आवाज टाकला होता. पण कुत्र तिकडे आलच नाही. त्या घरातले एक आजोबा खिडकीपाशी आले आणि म्हणाले की " कुत्र आता जिवंत राहीलेलं नाही " आणि निघून गेले. आम्ही सगळे शांत झालो. खूप जवळची गोष्ट गेल्यासारखं झालं. कोणी काहीच बोलल नाही.

लहानपणी ज्या गोष्टी आम्ही मजा आणि मस्ती म्हणून त्या कुत्र्याशी करायचो. त्याचाशी एक वेगळच नातं झाल होतं. आणि ते लहान वयातल नांत अजून आम्हाला त्याची आठवण देत. आजही त्या रस्त्याने जाताना आम्ही एकदातरी त्या खिडकीकडे बघतो... आता फ़क्त एवढाच बदल झाला आहे कि ती खिडकी त्यांनी कायमस्वरूपी बंद केलेली आहे....

© ओंकार शिंदे 
२ जानेवारी २०१४

No comments:

Post a Comment