Wednesday 8 October 2014

एक पत्र शाळेकडून....!!!

एक पत्र शाळेकडून....




हे पत्र खूप दिवसांपूर्वी लिहिलं होतं. शाळेतल्या मित्रांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी द्यायचा बेत होता. पण हे पत्र त्या सर्व मित्रंपर्यंत पोहचलं नाही. कारण बरेच मित्र हे शाळा सोडल्यानंतर भेटलेच नाही. तेच पत्र त्यांच्यापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न. या पत्रामध्ये खूपसारे बदल करून आज हे पत्र तुमच्यासमोर मांडतोय…  


ओळखलस का मला ??  खूप दिवसापासुन तुझ्याशी बोलायची इच्छा होती.  पण जसा तुला वेळ होत नाही तसा मलाही झाला नाही.  आणि हे असं किती दिवस चाललं असतं बोलायची इच्छा असताना तुझ्यापासून लांब राहायचं.  म्हणून आज वेळ मिळाला तर वाटलं बोलाव तुझ्याशी… थोडा वेळ काढ माझ्याशी बोलायला… 


अरे माझ्यात काही बदल झाले काही काळाने केले. बदल म्हणजे तुझी शाळा आहे तशीच आहे. फ़क्त तुझ्या तुकड्यांच्या जागी हाऊस झालेत. असेच काही छोटे मोठे बदल. काळाबरोबर तु पण बदलतोस मग मला नको बदलायला. जशी वेळ निघून गेली तसा तू मोठा झाला आणि मी काळानुसार म्हातारी झाले.  


पण मी सुधा आता Modern झालीये. छान असे रंग दिलेत मला. प्रत्येक वर्गात एक नवीन फळा, नवीन बाकडी. सर्वकाही नवीन पण तुझ्याबरोबरच्या जुन्या आठवणीच जास्त आठवतात.   


तुला आठवत आहे का ती ६ वर्ष आपण एकत्र घालवलेली. ती ६ वर्ष जेवढी तुझ्या लक्षात नसतील तेवढी माझ्या लक्षात आहेत.  तुझं ते ५वी मध्ये प्रवेश करतानाच पहिलं पाऊल, त्या पाचवीच्या वर्गातले पहिले मित्र  आणि त्या मनातली ती भिती फ़क्त मीच ओळखु शकते. १० वी झाल्यावर त्याच शाळेतुन जातानाची मनस्थिती फ़क्त मीच समजू शकते. कारण तु जाताना माझी मनस्थिती पण तशीच होती. फक्त मला भावनांना बाहेर दाखवता येत नाही. त्या शाळेच्या कोपऱ्यात लपून ठेवलेल्या आहेत.  


त्या बेंचवर जेथे तु बसायचा तेथे तु एका कोपय्रात तुझं नाव कोरून ठेवलय ते अजुन तसचं आहे. त्याच बेंचवर तु पेनगेम खेळायचा. त्याच बेंचवर हाताने ढोल वाजावायचा. मला माहित आहे सगळं. त्या बेंचकडे बघितलं की तुझी आठवण येते. पण तो बेंच दिवसेंदिवस जुना होत चाललाय. काही दिवसांनी त्याची माझ्यासारखी अवस्था होईल त्यावर नवीन फळ्या बसतील तुझी नाव कोरलेली फळी काढून टाकली जाईल. असं असलं तरी माझ्या मनातली आणि तुझ्या मनातली माझी जागा कोणी पुसू शकणार नाही.    


आठवतयं तुला ते फ़रशीचं मैदान, जेथे तु फ़रशीने, कधीतरी रबरी चेंडुने खेळायचास..? तिथेच १५ August ला झेंड्याला वंदन करून उभा असायचा. त्यावेळेस तुझ्या डोळ्यातून जे पाणी यायचं जांभळी देताना ते पण मला माहीत आहे. परत २६ जानेवारीची प्रजासत्तकाची परेड, तिकडचं Football खेळणं, PT च्या तासाला टाईमपास करणं आणि केस कापलेले नाही म्हणून सरांचा मार खाणं. परत प्रयोग शाळा तर राहीलीच. तिकडे तु तर काय कल्ला घालायचास कारण तिकडे बघणारं कोणीच नाही ना....? पण माझं तुझ्या सगळ्या गोष्टिंकडे मनापासुन लक्ष होतं. खुप आठवण येते तुझी… पण परत पुढे शिकायला येणाय्रा तुझ्या छोट्या भावांची जबाबदारी माझ्यावरच आहे. त्यांच्याबरोबर पण मला या सुंदर आठवणी जगायची खूप मोठी संधी आहे आणि यापुढेही असेल.     


मला माहित आहे कि सध्या शिक्षण आणि नोकरी यांसारख्या गोष्टिंमुळे तुला वेळ देणं शक्य होत नसेल कदाचित. सगळं व्यवस्थित चाललयं तुझ, कधीतरी एकदा तुला माझी आठवण नक्की येत असेल. तर माझ्यासाठी थोडा वेळ काढून भेटायला येत जा.  शाळेत असताना तु मला खुप प्रेम दिलयं. मला सुद्धा आठवण येते तुझी. तुझ्या त्या आठवणींचाच तर मला आधार आहे.  आता तु खुप मोठा झाला असशील. वर्षातून एकदा तरी माझी भेट घेत जा. मला पण वाटतं कि माझ्या मित्राने मला भेटावे. हि एक माझी इच्छा आहे.  Hope so तु पुर्ण करशील. मी वाट बघत आहे तुझी. तुला तुझ्या भावी आयुष्यासाठी तुला हार्दिक शुभेच्छा..!!!

© ओंकार शिंदे 
८ ऑक्टोबर २०१४ 

Wednesday 1 October 2014

आयुष्य जगायच कसं शिकवणारं अनोख नातं...!!!




आपल्या आयुष्यामध्ये  खूपसारी नाती येतात. काही नाती गळ्यात मारली गेलेली असतात तर काही नाती आपण स्वतः बनवलेली असतात. प्रत्येक नात्याचा ओलावा हा वेगवेगळा असतो. 

असच एक नातं… तसं म्हंटल तर ते लहानपणापासून खूप जवळचं आहे आणि याच नात्याने शिकवल की आयुष्य जगायचं कसं… आयुष्याच्या प्रयेक पायरीवर या नात्याचा एक वेगळा असा पाठ उलगडत गेला. हे नात म्हणजे माझा मावस भाऊ आणि वहिनी… 

प्रत्येक पायरीवर या नात्याचा ओलावा वाढतच गेला. या दोघांनी आयुष्यात प्रत्येकाच्या मनात एक वेगळीच जागा निर्माण केली. आयुष्याच्या प्रत्येक वाटेवर हे दोघ आपला ठसा उमटवत गेले. त्या दोघंविषयी काहीतरी मनातून वाटतंय तेच मांडायचा प्रयत्न करतोय. माहित नाही योग्य तो न्याय देऊ शकेल की नाही… 

पाहिलं मी माझ्या भावाविषयी बोलतो. माझा भाऊ मी त्याला भाई म्हणतो. वयाने तसा तो बराच मोठा आहे तरी अजून एक मोठा भाऊ नसून एक जवळचा मित्रच म्हणून राहतोय. खूप कमी लोक असतात जी वयाने मोठी असली तरी लहानाला मित्रासारखे वागवतात. लहानपणापासून खूप कष्टात दिवस काढले त्याच्या आयुष्याच्या प्रत्येक वाटेवर फक्त त्याला हवं तेवढ यश कधीच मिळू शकल नाही. या अपयशाला कदाचित त्याच्या नशीबाची साथ असेल. एवढ असून सुद्धा मी त्याला कधीच खचताना पाहिलं नाही. प्रत्येकक्षणी त्याचे प्रयत्न हे चालूच असतात काही ना काही करण्यासाठी…   

माहित नाही काय आहे हा प्रकार… त्याचा विचार कधीच मनातून सुटत नाही. इतरांना मदत करतो पण स्वत: त्रास सहन करेल. कदाचित हा मूर्खपणा वाटत असेल कि स्वत: त्रास सहन करून इतरांना मदत करणं. पण स्वार्थी विचार न करणारे माणसं खूप नशिबाने मिळतात. आज असे खूप जण आहेत की ज्यांना वाटतं की मला याच्यासारखा बाप, मित्र, भाऊ असावा ( कदाचित कोणी तोंडावर बोलणार नाही ) पण काहीही नसताना इतरांच्या मनात राहणारा एक आदर्श भाऊ मला मिळाला. या नात्याच्या मला अभिमान असण्यापेक्षा आदर जास्त आहे. कारण याच नात्याने सर्वात पहिल्यांदा समाधान, आनंद, कष्ट, आणि Compromise या शब्दाचा खरा अर्थ शिकवलाय   

दुसरी व्यक्ती म्हणजे माझी वहिनी… "म्हणजे माझ्या वहिनी"… अहो जाहो करणं गरजेच नाहीये खरतर पण तेवढा आदर कमीच आहे त्यांच्या योग्यतेसुसार… एक सुंदर अश्या घरातून आमच्या घरात पाउल टाकणारी एक खूप जवळची बहिण किंवा मैत्रीण म्हणू शकतो. आयुष्याच्या प्रत्येक वाटेवर यांनी माझ्या भावाला साथ दिली. आयुष्यात प्रत्येक कष्ट प्रत्येक अडचणीत त्यांनी कधी साथ सोडली नाही.

त्यांच्याविषयी काही ओळी आहेत त्याच बरच काही बोलून जातील त्यांच्याबद्दल

तुला विहिनी म्हणू की ताई
तुझी माया म्हणजे जणू आई

कधी वाटलच नाही तु दुसऱ्या घरातली
चांगली मैत्रीण तु आमच्या मनातली

स्वाभिमान म्हणजे काय हे तुझ्यामुळे कळालं
आम्हा सगळ्यांना माणुसकीच प्रेम मिळालं 

इतरांची स्वप्न तू स्वतःच्या नजरेतून पाहीली
स्वतःची स्वप्न पुर्ण करायची राहीली

अडचणीत तु कधी हात सोडला नाही
स्वप्न संपत चालली होती तरी तु ध्यास सोडला नाही

असं नेहमी वाटतं आयुष्यात खुप दुःख आहे
तुझ्याकडे बिघतलं की कळतं या दुःखातही सुःख आहे

तुझ्याकडे बिघतलं की मन शांत होतं
जसं आईच्या कुशीत बाळाचं होतं

खुप काही बोलता येईल तुष्याविषयी ताई
खरंच तुझी माया जणू माझी आई


मन अस्वस्थ झालं की या दोघांच्या चेहऱ्याकडे बघितला की मन शांत होतं.हे नात खूप हवहवस वाटतं. काय आहे या नात्यात त्रुणानुबंध, प्रेम का ओढ? काहीच कळत नाही आणि आपलं मन पण आपल्याला काहीच कळू देत नाही. मनात काही नसताना पण बरच काही असतं असं वाटतं. जेवढा दुर असतो. तेवढाच प्रेमाचा ओलावा वाढत असतो. 

आज या नात्याविषयी लिहावस वाटलं… खुपवेळा असं होतं कि मनातून खूप बोलायचं असता पण बोलत येत नाही आणि खूप सारी नाती ही मनाच्या कुठल्यातरी कोपऱ्यात एक जागा करून राहतात… ती मनातली गोष्ट माझ्या काही जवळच्या लोकांसमोर आणण्याचा माझा प्रयत्न… कदाचित हे खूप वाचायला कंटाळवाण असेल… पण कोणाचातरी आदर्श ठेवणं त्यापेक्षा आदर्श व्यकतीच आयुष्यात असण्यासाठी खूप नशीब लागतं यामधून एवढच सांगायचय… 

सगळ्यात महत्वाच यांच नाव महेंद्र भाई आणि सीमा वाहिनी

© ओंकार शिंदे 
१ ऑक्टोंबर २०१४