Wednesday 15 January 2014

मनावरचं ओझं, मनाजवळच्या माणसाचं.....!!!



टाईमपास मराठी चित्रपट बघितला. त्या चित्रपटातलं एक वाक्य खूप आवडलं.  

"तू शिकलीस पण तुला बोलता येत नाही

मी नाही शिकलो पण मला बोलता येतं"

आजकाल असं खूपवेळा होत नसेल का ?? 

मनातल्या काही गोष्टी बोलायच्या असतात, सांगायच्या असतात, स्वतःची बाजू मांडायची असते, स्वतःची परिस्थिती समजावून द्यायची असते.पण होत उलटच. मनातल्या गोष्टी मनातच राहतात, सांगता येत नाही, बोलता येत नाही, स्वतःची बाजू मांडता येत नाही, आणि परिस्थिती, ही गोष्ट तर कोणी कधी कसं समजून घेईल हे सुद्धा माहित नाही

आपल्या मनात खूप काही असतं , काहीना काही भावना असते. तो राग असो किंवा प्रेम असो. मनात या गोष्टी खूप आतपर्यंत रुतलेल्या असतात. फक्त या गोष्टी आपणास बोलता नाही आणि त्याला कारण म्हणजे नात तुटण्याची भीती असो किंवा कोणासमोर वाईट व्हायचं नाही असा मनातला विचार असो. (खूपवेळा हा दुसरा विचार मनात असतो.) मनातली ती भावना आत अजून खोलपर्यंत रुतत जाते. आपण फक्त त्या व्यक्तीसमोर आल्यावर त्या भावनांना आवर घालतो.  

त्या व्यक्तीबद्दलचं प्रेम किंवा राग मनात वाढतच जातो. जी व्यक्ती एकेकाळी आपल्या मनाच्या खूप जवळ होती त्या व्यक्तीशी बोलणं वेळेनुसार अवघड होऊन जातं. एक दिवस मनात होणारी घुसमट वाढत जाते आणि त्या भावना कुठल्याही गोष्टीचा विचार न करता त्या व्यक्तीसमोर Express केल्या जातात. आणि आता चर्चा सुरु होते त्या भावना व्यक्त केलेल्या व्यक्तीविषयी...!!!

"अरे हा काय फालतूपणा आहे ? ती व्यक्ती असं का बोलली ? मला असं कधी वाटलं नव्हतं कि असं काही होईल ?" अश्या अनेक प्रश्नांवर चर्चा व्हायला सुरवात होते. काही वेळेस असे तर्क सुद्धा लावले जातात की या व्यक्तीच्या मित्रमैत्रिणींच्या संगतीमुळे त्या व्यक्तीने असा फालतूपणा केला. 

त्यानंतर त्या व्यक्तीला तुच्छ असल्यासारख वागवलं जात. त्या व्यक्तीला स्वतःपासून वेगळं केलं जातं. त्या व्यक्तीने काही गुन्हा केलेला असतो का ? दोन व्यक्ती एकमेकांच्या खूप जवळच्या असतात त्या दोघांमधल्या एका व्यक्तीने आपल्या भावना स्पष्ट सांगितल्या. तर त्या व्यक्तीने त्या नात्याविषयी प्रामाणिकपणा दाखवला असं वाटत नाही का ? 
  
आजकाल दोन जवळच्या व्यक्तीमध्ये समोरची व्यक्ती काय विचार करत आहे हे समजत नाही, म्हणजे या दोन्ही व्यक्ती एकमेकांना फसवत नाही का ? असं असूनही ती व्यक्ती परिस्थिती समजावून सांगत असते, तरीही त्या गोष्टी समजून घेतल्या जात नाहीत.  

जर कोणी आपल्या भावना सांगत असेल तर ती व्यक्ती चुकीची ठरते. कारण असं काही घडणं अपेक्षित नसत. त्यानंतर त्या व्यक्तीला या झालेल्या सर्व प्रकारामुळे वेगळ केलं जातं. त्यामुळे या व्यक्तीला खूप जवळच्या त्या व्यक्तीविषयी एक राग मनात वाढत जातो. जी व्यक्ती खूप जवळची होती. ती आता खूप दूर गेलेली असते. यामध्ये एक साधा विचार केला जात नाही कि "टाळी एका हाताने वाजत नाही"

मला हि गोष्ट लिहायचा कारण असं कि एका खूप जवळच्या मैत्रिणीच्या बाबतीत हेच झालं. आणि असं तिच्याच बाबतीत नाही पण खूप लोकांच्या बाबतीतही झालं असेल.

मनातल्या भावना जवळच्या व्यक्तीला सांगितल्या जातात ते नात वाढण्यासाठी… त्या भावनांचा विचित्र विचार करून व्यक्तीला स्वत:पासून  दूर करण्यात काय अर्थ असतो हेच उमगत नाही.

तीच व्यक्ती डोळ्यासमोर आली कि प्रेम वाटायचं आता त्याच व्यक्तीचा राग येतो असं होतं आणि मनावरचं ओझं, मनाजवळच्या माणसाचं फक्त त्या ठिकाणी तसचं राहत.

© ओंकार शिंदे 
 १५ जानेवारी २०१४

Thursday 2 January 2014

एक नातं वेगळं..... !!!


माझी शाळा घरापासून एक १५ ते २० मिनिटाच्या अंतरावर... आणि शाळा म्हणजे एकदम गावात... आता पुणे शहर यामध्ये गाव कुठे आलं? पुण्यामध्ये जी ठिकाणे पूर्वीपासून होती,  त्या ठिकाणाला गाव म्हणतात. शाळा ही फ़क्त ५ वी ते १० वी पर्यंतच आहे. आता ज्युनियर  कॉलेज पण चालू झालंय.

मी नुकताच ५ वी मध्ये प्रवेश घेतला होता. नविन शाळा म्हणून तस कौतूक तर होतच. आई पहिल महीनाभर शाळॆत सोडायला आली. नंतर मी माझा शाळेत जायला लागलो. शाळेत जाण्यासाठी घरापासून दोन रस्ते जात होते. त्यातला एक मोठा रस्ता आणि एक छोटा रस्ता. खरं सांगायच तर तसा त्या रस्त्यांमध्ये असा काही फ़रक नव्ह्ता पण तरी त्याला बरेच जण अश्या दोन रस्त्यांनी ओळखायचे. आम्ही सगळे मित्र शक्यतो छोट्या रस्त्यानेच जायचो. असंच एक वर्ष निघून गेलं.

६ वी ला असताना माझ्याकडे सायकल आली. मी आता सायकलने शाळेत जायला सुरुवात केली. आता आम्ही सगळे मित्र मोठ्या रस्त्याने जायला लागलो . असच एक दिवस मी शाळेत जात असताना माझ्याबरोबर शाळेतले काही मित्र होते. शनिवार पेठ पोलीस चौकीच्या अलीकडे मोठ्या रस्त्याने जाताना एका मित्राने मस्ती केली. त्याने कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज काढला. आणि त्याला प्रतित्तोर म्हणून तसाच आवाज आला. सगळे हसायला लागले. मला हा आवाज कुठून आला कळलच नाही

परत दुसय्रा दिवशी असच घडलं. पण आज माझ लक्ष होत की तो आवाज कुठून येतो. शनिवार पेठ पोलीस चौकीच्या अलीकडे एक प्रभात टि स्टॉल आहे. त्या इमारतीत पहिल्या मजल्यावर एक घर आहे. त्या घराच एक विशेष होतं. त्या घराच्या ज्या खिडक्या होत्या त्यांच्या एकदम खाली एक छोटी खिडकी होती. त्यालासुध्दा एक ग्रिल केलेलं होतं. ती खिडकी त्यांनी त्यांच्या त्या घरातल्या कुत्र्यासाठी केली होती.

शाळेतल्या मुलांना ते कळलं होतं दररोज कोण ना कोणीतरी येऊन कुत्र्याचा आवाज काढायचं आणि ते कुत्र त्याच्या त्या बारीक खिडकीपाशी येऊन खाली बघुन भुंकायचं. सगळी मुलं हसायची आणि निघुन जायची. असं खूप दिवस होत राहील. फ़क्त बदल एवढाच झाला की आवाज देणारी मुलं बदलत राहीली. नंतर नंतर आम्ही मित्रांनी तो आवाज करण सोडून दिलं पण दुसर कोणिसुध्दा तसा आवाज दिला आणि परत प्रतित्तोर म्हणुन तसाच आवाज आला की आम्हाला हसू यायचं. अशीच शाळेतली ६ वर्षे निघून गेली. नंतर पुढे कॉलेज आणि करीअर.

एक दिवस असच त्याच मोठ्या रस्त्याने जाताना एका मुलाने सायकलवरुन जाताना भूंकण्याचा आवाज काढला पण आज वेगळच घडलं. प्रतित्तोर म्हणुन ते कुत्र खिडकीपाशी आलच नाही. मन थोडं अस्वस्थ व्हायला सुरुवात झाली. काही कळेनास झालं.

त्यानंतर दोन दिवसांनी मी माझ्या शाळेतल्या मित्रांना भेटलो. त्यांना तो घडलेला किस्सा सांगितला. त्यावर त्याने सांगितलं की मागच्या महीन्यात तो तिकडून जात असताना कोणितरी आवाज टाकला होता. पण कुत्र तिकडे आलच नाही. त्या घरातले एक आजोबा खिडकीपाशी आले आणि म्हणाले की " कुत्र आता जिवंत राहीलेलं नाही " आणि निघून गेले. आम्ही सगळे शांत झालो. खूप जवळची गोष्ट गेल्यासारखं झालं. कोणी काहीच बोलल नाही.

लहानपणी ज्या गोष्टी आम्ही मजा आणि मस्ती म्हणून त्या कुत्र्याशी करायचो. त्याचाशी एक वेगळच नातं झाल होतं. आणि ते लहान वयातल नांत अजून आम्हाला त्याची आठवण देत. आजही त्या रस्त्याने जाताना आम्ही एकदातरी त्या खिडकीकडे बघतो... आता फ़क्त एवढाच बदल झाला आहे कि ती खिडकी त्यांनी कायमस्वरूपी बंद केलेली आहे....

© ओंकार शिंदे 
२ जानेवारी २०१४