Saturday 21 December 2013

वेळ काही वर्षापुर्वीची, काही वर्षानंतरची


प्रत्येकाच्या आयुष्यात ही वेळ कधी ना कधी येतच असते. आज लहान असणार बाळ उद्या शाळेत जायला लागतं. नंतर शिक्षण, नोकरी, लग्न, मुले, आणि  रिटर्यमेंट म्हणजे म्हातारपण...

मला फ़क्त या सर्व साखळी मध्यल्या पहील्या आणि शेवटच्या म्हणजेच लहान बाळ आणि म्हातारपण या गोष्टींवर बोलायचयं

मला माहीत नाही की मी हा विषय का घेतला,  या आयुष्यातल्या या दोन्ही फ़ेज दिसताना वेगळ्या असल्यातरी त्यामध्ये अनेक प्रकारचं साम्य आहे.  तेच फ़क्त एका वेगळ्या प्रकारे समोर आणायचा प्रयत्न करतोय. कदाचीत या सर्व गोष्टी प्रत्येक व्यक्तीशी संबंधीत असताना वेगवेगळ्या असतील, पण एकंदरीत परिस्थितीवरुन हे लिहितोय.   

आपण लहान बाळ असताना आपल्याला काही कळत नसतं. आपल्याला एखाद्या गोष्टीविषयी कुतुहलता असते. त्या गोष्टीला हात लावयला गेलो की घरातली मोठी व्यक्ती हात लावू देत नाही. तरीही आपण काही झालं तरी त्या गोष्टीला हात लावायचा पूर्ण प्रयत्न करतो. काहितरी होतं, आणि आपल्याला कळतं त्याला हात का लावू नकोस असं का सांगत होते . 

असच आपल्या आजी आणि आजोबांच्या बाबतीत होत नसेल का ? बरेच मित्र आणि मैत्रीनी बोलून जातात कि त्यांना कळत नाही का ( यामध्ये मी पण मोडतो काहि वेळेस )? अर्थात आजी आजोबा खूप अनुभवामधून गेलेले असतात तरी त्यांना ही गोष्ट समजत नसेल अस पण वाटणं सहाजीक आहे. एखादी गोष्ट घरात येते आपण त्यांना सांगतो त्या गोष्टीला हात लावू नका आणि नकळतं त्यांच्याकडून त्या गोष्टीला काहितरी होतं आणि आपण चिडून म्हणतो की " तुम्हाला सांगितल होतं ना की हात लावू नका." आपण लाहनपणी एखादी चूक केली की हे आजी आजोबा आपल्याशी असच वागले होते का? या गोष्टीचा विचार करायला हवा.

लहानपणी खूपवेळा आपण एखादी गोष्ट आवडली की ती पाहिजे यासाठी सारखे मागे लागायचो. आज हेच आजी आजोबा आपल्या मागे एकच गोष्ट घेऊन सारखे मागे लागले की आपली चिडचिड का होते ? जेवून घे, जेवून घे असं बोलून सारखे मागे लागतात या गोष्टीचा रागराग होतो. लहान असताना आपल्याच मागे पळत यांनी आपल्याला जेवायला घातलं होतं हे सुध्दा विसरून चालणार नाही.

आपण खूप वेळा ऐकतो की या बाळाला बोलायला खूप लागतं. त्याच्यासमोर कोणी नसेल तर त्याला रडू येतं, रहावत नाही. आज आपले आजी आजोबा एकटे घरी असतात त्यांना कसं वाटत असेल ? दिवसभर कोणीही बोलायला नसतं आपण घरी आल्यानंतर ते सारखे बोलत असतात. एकच वाक्य, एकच काम सारखं सांगतात. त्यात त्यांच कुठे चुकतं ? नंतर हे सारख सारख बोलण्याची त्यांना सवय होऊन जाते आणि या गोष्टीचा आपल्याला त्रास होऊ लागतो.

यासाठी आपल्याला काय करता येईल याचा विचार करण्यापेक्षा आपण चिडचिड जास्त करतो. एकदा त्यांची जागा विचारात घेऊन विचार केला तर या प्रश्नांची उत्तरं मिळतील कदाचीत... 

आज फ़क्त आपण या गोष्टीला म्हतारपणात येणार बालपण म्हणू शकू... एक लहान मुलगा म्हणून त्या बालपणाकडे बघितलं तर चिडचिड आणि रागराग होणार नाही

लहान बाळाची वेळ आपल्या आयुष्यात काही वर्षापुर्वी येऊन गेली आहे... आता वेळ आहे फ़क्त काही वर्षानंतरची...   


© ओंकार शिंदे 
२१ डिसेंबर २०१३

No comments:

Post a Comment