Tuesday 18 February 2014

जानेवारी मधले खड्यातले पुणे....!!!



पुणे गेलं खड्यात किंवा खड्यातले पुणे असं वर्तमानपत्रात येणारी पावसाळयातील बातमी आपण नेहमीच बघत असतो. ही बातमी येते तो महिना साधारण सप्टेंबर महिना असतो. कारण आधीचे तीन महिने पाऊस पडलेला असतो आणि त्याचे हे सर्व परिणाम असतात. दर वर्षी वर्तमान पत्रात येणारी ही बातमी, कधी येते आणि कधी जाते कळतंच नाही. पुण्यामधील काही गणेशोत्सव मंडळांनी तर देखाव्याद्वारे या गोष्टींना वाचा फ़ोडायचा पण प्रयत्न केला होता.

सध्या चक्क जानेवारी मध्ये पुण्यामधल्या रस्त्यांना खड्डे पडलेत. आणि खड्डे पडायला तसा पाऊस पण नाही पडलाय पुण्यामध्ये परंतु तरीही खड्डे पडलेत. एक प्रकारचं आश्चर्य झालंय. खुप लोकांना कदाचित जाणवलं पण असेल. हे जे काही खड्डे पडलेत ते पुण्याच्या प्रत्येकी एक कि.मी च्या परिसरात पसरलेत. त्याला कारण म्हणजे जवळ आलेल्या निवडणुका. 

आज पुण्यातल्या खूप प्रभागामध्ये रस्त्यांची दुरुस्तीची कामे, ड्रेनीज पाईप, वायरिंगची कामे चालू आहेत. ज्या ज्या प्रभागात ही कामे चालू आहेत ती कामे कोणत्या ना कोणत्या नेत्याच्या पदाच्या निधीतून चालू आहेत. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बहूतेक या रस्त्यांसाठी दिले जाणारे निधी हे फक्त जानेवारी महिन्यातच आलेले आहेत. 

शनिवार पेठ, प्रभात रोड, नीलायम चौक अश्या पुण्यातल्या अनेक रहदारीच्या आणि गर्दी असणाऱ्या प्रत्येक ठिकाणी सध्या ही सगळी कामे चालू आहेत. आता जानेवारी महिन्यात एकाचवेळी पुण्याच्या रहदारीच्या आणि गर्दी असणाऱ्या प्रत्येक ठिकाणी खड्डे पडलेत त्याच कारण तर साहजिकच आहे कि निवडणुका जवळ आल्या आहेत आणि आता आमचा पक्ष सरकारने दिलेल्या निधीतून ही सामाजिक कामे करत आहे हे दाखवायचे आहे आणि जनतेला दाखवायचं कि आम्ही किती कामे केली. आत्ताही तुम्ही खूप ठिकाणी कामं चालू असतील आणि बघायला गेलात तर कळेल की जवळपास प्रत्येक ठिकाणी काही ना काही बोर्ड लावलेत. 

" माननीय ............. यांच्या निधीतून अमुक अमुक दुरुस्तीचे काम चालू आहे."

त्यांनी केलेल्या या कामांचा ते आपल्या अहवालात उल्लेख करतात. खरच अशी काही प्रकारची केलेली कामे आहेत का? ज्याचा समाजाला हवा तितका फायदा झाला असेल? आज हा सरकारने दिलेला निधी फक्त या ड्रेनीज पाईप, वायरिंग, रस्ता दुरुस्ती यासाठीच फक्त वापरायचा असतो का ? हा एक प्रश्नच आहे कि फक्त याच कारणासाठी निधी दिला जातो का ? 

असे काही नेते असतील सुद्धा कदाचित ज्यांनी समाजासाठी सरकारने दिलेल्या निधीतून अनेक वेगळी  कामे केली देखील असतील पण सामान्य माणसाला या गोष्टींचा आढावा कसा मिळणार हा प्रश्नच आहे.
  
पुण्यातील एका परिवर्तन नावाच्या संस्थेने मागील विधानसभेच्या निवडणुकेच्यावेळी पुण्यामधील नगरसेवक आणि त्यांनी यासंबंधी असणाऱ्या निधी कसा वापरला याचं एक छान प्रगतीपुस्तक तयार केलं होतं. त्यामध्ये प्रत्येकाच्या केलेल्या कामासंबंधीचा आढावा त्यांनी घेतला होता. 


या साईटवर गेल्यावर तुम्हाला नगरसेवक आणि त्यांनी केलेल्या कामाचा आढावा मिळेल. हा आढावा २०१२-२०१३ मधील आहे. 

पण फक्त यामध्ये रस्ता दुरुस्ती आणि ड्रेनीजची कामे सोडून दुसरी कामे करणारे पण काही नगरसेवक आहेत. 

कदाचित हे रस्त्याला खड्डे पाडलेले चित्र पुढच्या निवडणुकीपर्यंत बदललेले असेल आणि कमीत कमी पावसाळ्यात तर नाही परंतु निवडणुकांच्या वेळी खड्यातल्या पुण्याचे चित्र वेगळे असेल.  


© ओंकार शिंदे
१८ फेब्रुवारी २०१४

No comments:

Post a Comment