Tuesday 18 February 2014

जानेवारी मधले खड्यातले पुणे....!!!



पुणे गेलं खड्यात किंवा खड्यातले पुणे असं वर्तमानपत्रात येणारी पावसाळयातील बातमी आपण नेहमीच बघत असतो. ही बातमी येते तो महिना साधारण सप्टेंबर महिना असतो. कारण आधीचे तीन महिने पाऊस पडलेला असतो आणि त्याचे हे सर्व परिणाम असतात. दर वर्षी वर्तमान पत्रात येणारी ही बातमी, कधी येते आणि कधी जाते कळतंच नाही. पुण्यामधील काही गणेशोत्सव मंडळांनी तर देखाव्याद्वारे या गोष्टींना वाचा फ़ोडायचा पण प्रयत्न केला होता.

सध्या चक्क जानेवारी मध्ये पुण्यामधल्या रस्त्यांना खड्डे पडलेत. आणि खड्डे पडायला तसा पाऊस पण नाही पडलाय पुण्यामध्ये परंतु तरीही खड्डे पडलेत. एक प्रकारचं आश्चर्य झालंय. खुप लोकांना कदाचित जाणवलं पण असेल. हे जे काही खड्डे पडलेत ते पुण्याच्या प्रत्येकी एक कि.मी च्या परिसरात पसरलेत. त्याला कारण म्हणजे जवळ आलेल्या निवडणुका. 

आज पुण्यातल्या खूप प्रभागामध्ये रस्त्यांची दुरुस्तीची कामे, ड्रेनीज पाईप, वायरिंगची कामे चालू आहेत. ज्या ज्या प्रभागात ही कामे चालू आहेत ती कामे कोणत्या ना कोणत्या नेत्याच्या पदाच्या निधीतून चालू आहेत. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बहूतेक या रस्त्यांसाठी दिले जाणारे निधी हे फक्त जानेवारी महिन्यातच आलेले आहेत. 

शनिवार पेठ, प्रभात रोड, नीलायम चौक अश्या पुण्यातल्या अनेक रहदारीच्या आणि गर्दी असणाऱ्या प्रत्येक ठिकाणी सध्या ही सगळी कामे चालू आहेत. आता जानेवारी महिन्यात एकाचवेळी पुण्याच्या रहदारीच्या आणि गर्दी असणाऱ्या प्रत्येक ठिकाणी खड्डे पडलेत त्याच कारण तर साहजिकच आहे कि निवडणुका जवळ आल्या आहेत आणि आता आमचा पक्ष सरकारने दिलेल्या निधीतून ही सामाजिक कामे करत आहे हे दाखवायचे आहे आणि जनतेला दाखवायचं कि आम्ही किती कामे केली. आत्ताही तुम्ही खूप ठिकाणी कामं चालू असतील आणि बघायला गेलात तर कळेल की जवळपास प्रत्येक ठिकाणी काही ना काही बोर्ड लावलेत. 

" माननीय ............. यांच्या निधीतून अमुक अमुक दुरुस्तीचे काम चालू आहे."

त्यांनी केलेल्या या कामांचा ते आपल्या अहवालात उल्लेख करतात. खरच अशी काही प्रकारची केलेली कामे आहेत का? ज्याचा समाजाला हवा तितका फायदा झाला असेल? आज हा सरकारने दिलेला निधी फक्त या ड्रेनीज पाईप, वायरिंग, रस्ता दुरुस्ती यासाठीच फक्त वापरायचा असतो का ? हा एक प्रश्नच आहे कि फक्त याच कारणासाठी निधी दिला जातो का ? 

असे काही नेते असतील सुद्धा कदाचित ज्यांनी समाजासाठी सरकारने दिलेल्या निधीतून अनेक वेगळी  कामे केली देखील असतील पण सामान्य माणसाला या गोष्टींचा आढावा कसा मिळणार हा प्रश्नच आहे.
  
पुण्यातील एका परिवर्तन नावाच्या संस्थेने मागील विधानसभेच्या निवडणुकेच्यावेळी पुण्यामधील नगरसेवक आणि त्यांनी यासंबंधी असणाऱ्या निधी कसा वापरला याचं एक छान प्रगतीपुस्तक तयार केलं होतं. त्यामध्ये प्रत्येकाच्या केलेल्या कामासंबंधीचा आढावा त्यांनी घेतला होता. 


या साईटवर गेल्यावर तुम्हाला नगरसेवक आणि त्यांनी केलेल्या कामाचा आढावा मिळेल. हा आढावा २०१२-२०१३ मधील आहे. 

पण फक्त यामध्ये रस्ता दुरुस्ती आणि ड्रेनीजची कामे सोडून दुसरी कामे करणारे पण काही नगरसेवक आहेत. 

कदाचित हे रस्त्याला खड्डे पाडलेले चित्र पुढच्या निवडणुकीपर्यंत बदललेले असेल आणि कमीत कमी पावसाळ्यात तर नाही परंतु निवडणुकांच्या वेळी खड्यातल्या पुण्याचे चित्र वेगळे असेल.  


© ओंकार शिंदे
१८ फेब्रुवारी २०१४

Saturday 1 February 2014

मुंबईचं स्पिरीट का मुंबईची गरज...!!!


काही दिवसापूर्वीच मुंबईला जाणं झालं. मुंबईला जाताना मी जाण्यासाठी तसा एस टी ने गेलो होतो. जाताना ठाणे पर्यंतचा प्रवास खूप छान झाला. ठाण्याला आल्यानंतर आता आपण मुबईमध्ये शिरत असल्याची जाणिव झाली. नुसती ती गर्दी आणि पुण्यातून रिकामी असलेली एस टी अचानक एका क्षणात भरली. रस्त्याने असणारी वर्दळ काही केल्या कमी होताच नव्हती ठाण्यामधून पुढे प्रवास सुरु झाला. रस्ता ओलांडून पुढल्या प्रवासासाठी जायचं होतं. त्यासाठी एका पुलाची व्यवस्था केलेली होती आणि विशेष म्हणजे त्या पुलास जोडणारे दोन रस्ते होते एक म्हणजे रेल्वे प्रवास करून आलेल्या लोकांसाठी थेट रेल्वेच्या प्ल्याटफॉर्मकडून आणि एक होता तो रस्त्याच्या बाजूने आलेल्या पादचाऱ्यांसाठी. त्या पुलाच्या खालच्या बाजूला एक रिक्षाच वाहनतळ होतं आणि त्या रिक्षा मुंगीच्या चालीने हळू हळू पुढे सरकत होत्या. आमची गाडी हालली आणि जाता जाता मुंबई मधल्या घोडबंदर परिसरात मला वाहतूक  कोंडी मिळाली. एकंदरीत आता खऱ्या प्रवासाला सुरवात झाली होती.

प्रवास थांबला तो माझा वसई रोडला माझ्या बहिणीच्या घरी. तिकडे थांबून मला एका मैत्रिणीच्या लग्नाच्या रिसेप्शनला जायचं होतं. ते लग्न होतं बोरावलीला. वसई रोड पासून एक ८ ते १० स्टेशन पुढे असेल. एकटा असल्यामुळे वसई रोड वरून बसने जाता येईल का ते बघितलं पण ते शक्य नव्हतं. म्हणून शेवटी नाईलाजाने मला लोकलने ( रेल्वेने ) जावं लागलं. लोकलने जायचा कंटाळा असं काही नाही, परंतु खूप वर्षापूर्वी केलेला लोकलचा मुंबईचा प्रवास आज नको होता आणि आता काही दुसरा पर्याय पण नव्हता. संध्याकाळी आम्ही ५:३० च्या सुमारास वसई रोड येथून लोकल पकडली आणि विशेष म्हणजे त्या लोकल मध्ये आजिबात गर्दी नव्हती. आणि एक ६: ३० च्या सुमारास आम्ही बोरिवलीला पोहचलो . 

बोरिवलीला पोहचल्यानंतर स्टेशनच्या बाहेर आलो. आम्ही रिसेप्शनच्या कार्यालयाचा पत्ता शोधू लागलो. तिकडे जाता जाता एक काका दुकानात फोन वर बोलत होते. त्यांच्या दुकानाच्या जवळ गेलो आणि त्यांचा फोन बंद झाल्यानंतर काकांना पत्ता विचारला. काकांनी पत्ता असा सांगितला " यहासे सिधे जाओ, और बाये मुडो" काकांना विचार काही जवळची खुण सांगू शकता का ? काका अचानक चिडले आणि म्हणाले " मै यहा पता बताने के लिये नही बैठा हुं, आगे जाके किसीको पुछो " आणि एकंदरीत काकांचा असं बोलणं ऐकून आम्ही पुढे गेलो. पुढे आम्हाला पत्ता मिळाला आणि आम्ही कार्यालयावर पोहचलो. कार्यालयावर पोहचल्या पोहचल्या बघितलं तर काय फक्त आमच्या पूर्वी ४ लोक येउन बसले होते आम्ही पोहचलो संध्याकाळी ६;४५ च्या सुमारास. रिसेप्शनची वेळ होती संध्याकाळी ६ ची. अजूनही नवरा बायको आले नव्हते त्याला कारण ते विरारच्या जवळपास मुंबईच्या वाहतूक कोंडीत अडकले होते. आता कमीत कमी लग्नाच्या दिवशी तरी नवरा बायको यांनी कारने तरी यायला पाहिजे ते लोकलने कसे येणार...?? आज त्यांनी कारने येणं हि त्यांची गरज होती. त्याचा परिणाम असा झाला की संध्याकाळी ६ वाजता सुरु होणारं रिसेप्शन रात्री ८:४५ ला सुरु झालं. उशीर झाल्यामुळे आम्ही त्यांना भेटलो आणि लगेच निघालो. 

येताना बोरीवली रेल्वे स्टेशन वर लोकल लागलेली होती. आम्ही आतमध्ये शिरलो. त्यानंतर ५ मिनिटामध्ये लोकलचा डब्बा पूर्ण भरला आणि आता आतमध्ये चेंगरा चेंगरी सुरु झाली. पुढच्या प्रत्येक स्टेशनवर लोकलमध्ये गर्दी कमी होण्यापेक्षा वाढतच चालली होती. भाईंदरच्या स्टेशन वर काही लोकांचा घोळका आत शिरला आणि हा घोळका कुठल्याही गोष्टीचा विचार न करता आतल्या गर्दीला अजून आत रेटत होता. माझ्याबरोबर माझी ताई पण होती. त्यामुळे या गर्दीचा त्रास काय होत होता ते माझं मलाच माहित. नंतर कळलं कि भाईंदर मध्ये असणारी लोकल काही कारणास्तव कॅन्सल झाल्यामुळे एवढी गर्दी वाढली. शेवटी आम्ही एका माणसाच्या मदतीने मार्ग काढत त्या  लोकलमधून बाहेर पडलो. 

दुसऱ्या दिवशी सकाळी आदल्या दिवशीचा अनुभव घेऊन मला परत  लोकलने प्रवास करायचा होता. त्यासाठी मी आता लोकलमध्ये शिरल्यानंतर दाराच्या जवळ उभा राहिलो जेणेकरून जास्त आत ढकलल्या जाणार नाही. माझं थांबायचं मीरा रोड हे स्टेशन जसं जवळ आलं तसं लोकल थांबण्याआधीच प्रवाश्यांनी प्ल्याटफॉर्मवर उड्या मारल्या कारण मीरा रोडच्या स्टेशनवर खूप गर्दी होती आणि या गर्दीने मला आत लोटू नये म्हणून लोकल थांबल्या थांबल्या मी लगेच बाहेर पडलो. आणि एक सुटकेचा नि:श्वास सोडला.

आजही त्या लोकलचा डब्बा तसाच भरलेला आहे ती लोकांची गर्दी तशीच लोकलमधल्या त्याच गर्दीला आत रेटत आहे आणि आतली माणसं त्या गर्दीतून बाहेर येण्याचा एक मार्ग शोधत आहेत. मुंबई मध्ये याआधी ज्याकाही घटना घडल्या त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी सर्व लोक परत आपापल्या कामाला लागलेले दिसतात आणि याला मुंबईचं स्पिरीट म्हणून बोललं जातं. खरच हे मुंबईचं स्पिरीट आहे का मुंबईची गरज आहे...??

त्या दोन दिवसातली, पूर्वीची लोकल सुटल्यामुळे दुसऱ्या लोकलमध्ये जागा नसताना शिरणारी लोकं, कुठल्याही गोष्टीचा विचार न करता लोकल चालू असताना प्ल्याटफॉर्मवर उड्या मारणारी लोकं, तशीच डोळ्यासमोर आहेत.

माझा हा प्रवास फक्त दोन दिवसापुरताच होता. त्या दोन दिवसात मुंबईकरांची होणारी धावपळ, गर्दीतून पहिल कसा बाहेर पडता येईल याचा प्रयत्न, लोकलचा प्रवास कसा व्यवस्थित करता येईल, या गोष्टींचा एक वेगळाच अनुभव आला.

हे सर्व लोक ज्यावेळेस वेळेपेक्षा पुढे धावण्याचा प्रयत्त्नातून बाहेर पडतील त्यावेळेस त्यांच्या चेहऱ्यावरचा समाधान बघण्यासारखं असेल. फक्त मनापासून एक इच्छा आहे कि मुंबईच्या गरजेला मुंबईचं स्पिरीट म्हणून चादर घातली जाऊ नये. मुंबईच्या कुठल्याही सामान्य माणसाने या गोष्टीचा विचार केला तर कदाचित त्याला त्याचं खरं उत्तर मिळू शकेल.

© ओंकार शिंदे 
१ फेब्रुवारी २०१४